कोकणातील जांभळे बाजारात दाखल   

किरकोळ बाजारात ३५० ते ४०० रुपये किलोचा दर

पुणे : आरोग्यवर्धक फळ म्हणून जांभळाची ओळख आहे. विशेष म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडणारे हे फळ आहे. त्यामुळे प्रत्येक जण जांभळाच्या आवकेची प्रतिक्षा करत असतात. आता ही प्रतीक्षा संपली आहे, कोकणातून जांभळाची आवक मार्केटयार्डातील फळ विभागात सुरू झाली आहे. 
 
कोकणातील सावंतवाडी भागातून जांभळांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो जांभळांना ३५० ते ४०० रुपये दर मिळत आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू होणार आहे. गुजरातमधील जांभळे बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आणखी घट होईल.
जांभळांचा हंगाम एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू होतो. उन्हाळा सुरू झाल्यानंतर जांभळांना मागणी वाढते. कोकण, गुजरात, कर्नाटक, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात जांभळांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. सद्य:स्थितीत कोकणातील सावंतवाडी भागातून जांभळांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार जांभळांना ३५० ते ४०० रुपये किलो दर मिळाले आहे, अशी माहिती फळबाजारातील जांभूळ व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.
 
ग्राहकांकडून मोठी मागणी 
 
जांभूळ मधुमेहावर गुणकारी असल्याने गेल्या काही वर्षांपासून जांभळांना ग्राहकांकडून मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्राहक जांभळाच्या आवकेची प्रतिक्षा करत असतात. जांभळावर प्रक्रिया करुन सरबत, तसेच आईस्क्रीम तयार केले जाते. हंगामाच्या शेवटच्या टप्यात जांभळांचे दर कमी होतात. त्यानंतर प्रक्रिया उद्योगांकडून जांभळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. 
- पांडुरंग सुपेकर,  व्यापारी, मार्केटयार्ड.

Related Articles